कोलकाता - ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात सट्टेबाजी प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने या अटकेची माहिती दिली.
हेही वाचा - ISLचे तीन खेळाडू निलंबित, 'हे' आहे कारण
कोलकाताच्या गुन्हे शाखेचे संयुक्त आयुक्त मुरलीधर शर्मा यांनी सांगितले, 'बेटिंगची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री तीन लोकांना वृंदावन बासाक स्ट्रीट येथून अटक करण्यात आली. हे लोक क्रिकेट बेटिंग अॅपवर सट्टेबाजी करत होते.'
कुंदन सिंग (२२), मुकेश माळी (२२) आणि संजॉय सिंग (४२) अशी अटक केलेल्यांची नावे असून मोहम्मद सरजिल हुसेन (२२) यालाही न्यू मार्केट भागातून अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून चार मोबाइल फोन, दोन संगणक सेट, सुमारे दोन लाख रुपये रोकड व एक नोटबुक जप्त करण्यात आली आहे.
बांगलादेश विरुध्दचा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना टीम इंडियाने १ डाव आणि ४६ धावांनी जिंकला आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.