नवी दिल्ली - टीम इंडिया सद्या बांगलादेश संघाविरुध्द टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेश संघाने जिंकला तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला. तिसरा व अखेरचा सामना रविवारी १० नोव्हेंबरला नागपुरात होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी या मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे बारिक लक्ष आहे. यामुळे खेळाडुंना चांगली कामगिरी करावी लागणार आहेत. पण मागील काही सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या 'या' तीन खेळाडूंना बांगलादेश विरुध्दच्या मालिकेनंतर संघात स्थान मिळणे कठीण दिसते.
वाचा कोण आहेत ते तीन खेळाडू -
खलील अहमद -
भारत-बांगलादेश संघात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील २ सामन्यात खलील अहमदला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्याच्या १९ व्या षटकात बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीमने खलील अहमदच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या षटकात ४ चौकार ठोकले. दुसऱ्या सामन्यातही खलील अहमदने ४ षटकात ४४ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला.
कृणाल पांड्या -
आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा २०१९ नंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील टी-२० मालिकेत कृणाल पांड्याने दमदार प्रदर्शन करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. मात्र, त्यानंतर सुरू असलेल्या बांगलादेश दौऱ्यात कृणालला चांगली कामगिरी करता आलेली नाही. या मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात ४ षटकात ३२ धावा दिल्या. तर दुसऱ्या सामन्यात २ षटकात एक गडीच्या मोबदल्यात १७ धावा बहाल केल्या. कृणाल गोलंदाजीत फेल ठरला तरी फलंदाजीत यशस्वी ठरला आहे. ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे.
केएल राहुल -
२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत केएल राहुलची कामगिरी सरासरी राहिली. पण त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यात सपशेल अपयशी ठरला. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून राहुलच्या ठिकाणी रोहित शर्माची वर्णी लागली. तसेच त्याची बॅट सद्या बांगलादेश विरुध्द सुरू असलेल्या टी-२० मालिकेत अद्याप तळपलेली नाही. त्याने पहिल्या सामन्यात १७ चेंडूत १५ तर दुसऱ्या सामन्यात ११ चेंडूत ८ धावा केल्या आहेत.
या सर्व कारणांनी निवड समिती खलील अहमद, कृणाल पांड्या आणि केएल राहुल यांना वगळून नविन खेळाडूंचा विचार करु शकते.