नवी दिल्ली - आयपीएलच्या तेराव्या पर्वाला आता काही तासांचा अवधी उरला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लीगचा उद्या (१९ सप्टेंबर) पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या या आणि आगामी सामन्यांसाठी काही कडक नियम लावण्यात आले आहेत.
हॉटेलच्या बायो बबलमध्ये असणारे लोकच आयपीएल सामन्यांसाठी जाणाऱ्या संघासमवेत असतील. यात २ वेटर असतील. प्रत्येक संघ दोन बसमध्ये प्रवास करतील. भारतात हे संघ एकाच बसमध्ये प्रवास करत होते. सामन्यात सहभागी होणारे अधिकारीही या बबलमध्येच राहतील.
युएईच्या एका सूत्राने सांगितले, की जेव्हा संघ सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये जाईल, तेव्हा दोन बसमध्ये १७ खेळाडू आणि १२ प्रशिक्षक/सहाय्यक कर्मचारी असतील. तसेच २ वेटर आणि २ लॉजिस्टिकचे सदस्य त्यांच्यासोबत असतील. हॉटेलच्या बायो बबलचा भाग असणारे सदस्यच संघासह प्रवास करू शकतील. बसची ५० टक्के क्षमता वापरण्यात येईल.
ते म्हणाले, "अबुधाबी, दुबई, शारजाहमध्ये आयपीएलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, मग तो भारतीय असो किंवा इतर कोणत्याही देशाचा असो, त्याला प्रत्येक सहाव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल. या लोकांमध्ये स्टेडियमचे कर्मचारी, खेळपट्टी/ग्राऊंड स्टाफ आणि स्पर्धेशी जोडलेल्या प्रत्येकाचा समावेश आहे."
यूएईमध्ये, विशेषत: अबुधाबीमध्ये कोरोना संबंधित प्रोटोकॉल बर्यापैकी कठोर आहेत आणि आयपीएल संघांनाही ते स्वीकारावे लागतील.