नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत देशवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. गंभीर म्हणाला, “जेव्हा प्रत्येकजण एकत्र उभे राहतात आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही सरकारच्या सूचनांचे पालन करता, तेव्हाच आपण हा लढा जिंकू शकतो.”
गंभीर पुढे म्हणाला, “जर आपल्याला घरीच राहण्याचे सांगितले जात असेल तर या सूचना पाळणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. तसेच आपल्याला सामाजिक अंतर राखले पाहिजे. जेव्हा देणगीची चर्चा केली जाते तेव्हा त्याला काही मर्यादा नसते असे मला वाटते. जर एखाद्याने योग्य भावनेने एक रुपया जरी दिला तर ते मोठे योगदान आहे.”
गंभीरने यापूर्वी दिल्ली सरकारला ५० लाख आणि १ कोटी रुपयांची देणगी दिली होती. या व्यतिरिक्त त्याने पीएम रिलीफ फंडामध्ये दोन वर्षाचा पगार देण्याची घोषणा केली आहे.