मुंबई Cricket In Olympics : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये टी २० क्रिकेटचा अधिकृतपणे समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत सुरू असलेल्या आयओसीच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
क्रिकेटसह 'या' खेळांचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश : या आधी २०२२ बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्स आणि चीनमध्ये आयोजित २०२३ आशियाई गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक समितीकडून २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. आयओसीनं हा प्रस्ताव स्वीकारला आहे. आता बेसबॉल/सॉफ्टबॉल, क्रिकेट (टी २०), फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश हे खेळ २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा भाग होतील.
आयओसीद्वारे मतदान घेण्यात आलं : या प्रक्रियेसाठी आयओसीद्वारे मतदान घेण्यात आलं होतं. मतदानानंतर आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी या खेळांच्या ऑलिम्पिकमधील समावेशाची घोषणा केली. या पाच खेळांच्या समावेशाच्या प्रस्तावाला ९९ आयओसी सदस्यांपैकी फक्त २ सदस्यांनी विरोध केला. बीसीसीआयनं या आधी आपली स्वायत्तता धोक्यात येण्याच्या भीतीनं क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाला विरोध केला होता. मात्र त्यानंतर बोर्डानं २०२१ मध्ये आपली भूमिका बदलली. त्यानंतर आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये अधिकृतरित्या समावेश झालाय.
जय शाह यांनी निर्णयाचं स्वागत केलं : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयओसीच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. 'ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानं या खेळासाठी नवीन संधी निर्माण होतील. तसंच याद्वारे खेळाच्या इको-सिस्टमवर सकारात्मक परिणाम होतील', असं जय शाह म्हणाले. 'यामुळे पायाभूत विकासाला चालना मिळेल, स्पर्धा तीव्र होईल आणि व्यावसायिकांसाठीही संधी निर्माण होतील', असं जय शाह यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
- Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर दिसणार क्रिकेटचा थरार, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश
- Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी
- Cricket World Cup २०२३ : हिटमॅननं मोडला षटकारांचा आणखी एक रेकॉर्ड, गोलंदाजीत बुमराहची कमाल