मुंबई - आयपीएलचा संघ डेक्कन चार्जर्सची २०१२ मध्ये आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर डेक्कन चार्जर्सने बीसीसीआय विरोधात खटला दाखल केला होता. आता या खटल्यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यात बीसीसीआयसाठी दिलासा मिळाला आहे.
बीसीसीआयने २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सचा करार रद्द केला होता. यानंतर डेक्कन चार्जर्सने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत बीसीसीआयच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश सी. के. ठक्कर यांच्या खंडपीठाला नियुक्त केले होते. त्यांनी या प्रकरणात डेक्कन चार्जर्सच्या बाजूने निर्णय दिला होता. यात न्यायालयाने चौकशीअंती बीसीसीआयने डेक्कन चार्जर्सला ४८०० कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला होता.
पण आता या प्रकरणात बीसीसीआयला मुंबई न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयला आता डेक्कन चार्जर्सला ४८०० कोटी रुपये द्यावे लागणार नाहीत. मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षीचा ठक्कर खंडपीठाचा निकाल रद्द केला. त्यामुळे, बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली
हेही वाचा - कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळेंकडून एका महिन्याचे वेतन