मुंबई - कोरोना संकटामुळे जवळपास दोन वर्षे बंद पडलेल्या भारतातील स्थानिक क्रिकेटला पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने आज शनिवारी २०२१-२२ या वर्षाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांची घोषणा केली.
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेला २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना १२ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. रणजी करंडकाचा मागील हंगाम रद्द करण्यात आला होता. तर २०१९-२०२० साली कोरोनामुळे रणजी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यावेळचा रणजी हंगाम १६ नोव्हेंबर २०२१ पासून खेळला जाणार आहे. विजय हजारे करंडक स्पर्धा २३ फेब्रुवारी २०२२ ते २६ मार्च २०२२ या कालावधीमध्ये खेळली जाणार आहे.
यावर्षी स्थानिक स्पर्धांमध्ये एकूण २,१२७ सामने होणार आहेत. यात वयोमर्यादा असलेल्या, महिला आणि पुरुष सामन्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या चौदावा हंगाम मध्यातून स्थगित करण्यात आला आहे. आयपीएलचा हा उर्वरित हंगाम युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारा टी-20 विश्वकरंडकही कोरोनाच्या धोक्यामुळे भारताऐवजी यूएईमध्येच होणार आहे.
हेही वाचा - बायो बबल सोडून बाहेर फिरणाऱ्या ३ क्रिकेटर्संना झाली मोठी शिक्षा, टी-२० विश्वकरंडकमधून बाहेर?
हेही वाचा - Vitality Blast : टी-२०मध्ये एकाच दिवशी ३ गोलंदाजांनी घेतली हॅट्ट्रीक, पाहा व्हिडिओ