नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्य ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते. बीसीसीआयला आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवायचा नाही, त्यामुळे आशिया कप पाकिस्तानच्या बाहेर आयोजित केला जाऊ शकतो. आशिया चषकासंदर्भात आशिया क्रिकेट परिषदेची 4 फेब्रुवारीला बैठक झाली. या बैठकीत स्थळ बदलण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून आता मार्चमध्ये पुन्हा बैठक होणार आहे.
पाकिस्तानचा स्थळ बदलण्याला विरोध : आशिया चषक दुसऱ्या देशात हलवण्याचा निर्णय मार्चमध्ये होणाऱ्या एसीसीच्या बैठकीत घेतला जाईल. काल झालेल्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशिया चषक इतर कोणत्याही देशात न हलवण्याची मागणी केली आहे. मात्र आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. या बैठकीनंतर आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
यूएई किंवा श्रीलंकेत होऊ शकतो : आशिया चषक 2023 संदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक बहरीनमध्ये झाली. पाकिस्तानच्या मागणीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत आशिया कपसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मार्चमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत याचा निर्णय होणार आहे. आशिया चषक यूएई किंवा श्रीलंकेत होऊ शकतो, असे मानले जात आहे.
आशियाई क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर : जय शाह यांनी पुढील दोन वर्षांसाठी आशियाई क्रिकेटचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये आशिया चषकचा देखील समावेश आहे. मात्र आशिया चषक सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. श्रीलंका हा आशिया कपचा सध्याचा चॅम्पियन आहे. 2022 च्या फायनलमध्ये त्याने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला होता. भारत सात वेळा आशिया कपचा चॅम्पियन ठरला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बजेटमध्ये वाढ : एसीसीच्या या बैठकीत अफगाणिस्तान क्रिकेटच्या वार्षिक बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आशिया क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बजेटमध्ये एकमताने ६ टक्क्यांनी वाढ केली आहे. आता एसीबीचे वार्षिक बजेट 15 टक्के झाले आहे. बैठकीत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेटच्या विकासाबाबत चर्चा केली.