बंगळुरु - आयपीएल 2022 चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. तत्पुर्वी या स्पर्धेचा मेगा लिलाव बंगळुरु येथे पार पडत आहे. या लिलावाचा पहिला दिवस शनिवारी पार पडला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवासाचा लिलाव सोहळा आजही (रविवारी) सुरु आहे. काल (शनिवारी) पहिल्या दिवशी 388 कोटी रुपयांची बोली खेळाडूंवर लावण्यात आली होती. आज उर्वरित आणि अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ज्यामध्ये माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नवीन संघ मिळाला आहे.
अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने खरेदी केले आहे. अजिंक्यसाठी कोलकाता संघाने एक कोटी रुपये मोजले आहेत. या अगोदर मागील आयपीएल हंगामात तो दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याला यंदाच्या लिलाव सत्रा त बोली लागणार नाही, अशी जोरदार चर्चा सुरु होती. परंतु त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या रुपाने नवीन संघ मिळाला आहे.
अजिंक्य रहाणेने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 151 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने 141 डावात फलंदाजी करताना 3941 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये दोन शतकांचा आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), मुंबई इंडियंस, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या हंगामापासून तो कोलकाता संघासाठी खेळताना दिसेल.