मुंबई - भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला. आता भारतात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेवरही अनिश्चततेचे सावट आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धा होणार आहे. पण या काळात भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास टी-२० विश्व करंडक स्पर्धा युएईला हलवली जाण्याची शक्यता आहे. पण टी-२० विश्व करंडकाबद्दलचा अंतिम निर्णय येत्या काही महिन्यांत घेतला जाणार आहे
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारमधील काही प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि विश्व करंडक युएईला हलवली जाण्याची शक्यता अधिक आहे.
याबद्दल एका बीसीसीआयमधील सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, 'आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करावी लागली आहे. गेल्या ७० वर्षांतील सर्वात वाईट संकटाचा देश सामना करीत आहे, अशा वेळी विश्व करंडक स्पर्धेचे आयोजन करणे सुरक्षित नाही. नोव्हेंबरमध्ये भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे जरी स्पर्धेचे यजमान राहिले तरी स्पर्धा कदाचित युएईला हलवली जाऊ शकते.'
दरम्यान, असे असले तरी सध्या तरी टी-२० विश्व करंडकाबद्दलचा अंतिम निर्णय जूनमध्ये आयसीसीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
हेही वाचा - IPL तात्काळ का स्थगित करण्यात आलं?, गव्हर्निंग काउंसिलचे स्पष्टीकरण
हेही वाचा - IPL suspended : आयपीएलमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडूंना झाला कोरोना, जाणून घ्या