लखनऊ - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे चाहते कमालीचे दुखावले आहेत. देशांतर्गत स्पर्धांपासून दूर राहिलेल्या अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी लखनऊ येथील क्रीडाप्रेमींनी केली आहे.
हेही वाचा - फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प!
बाबू बनारसी दास बॅडमिंटन अकादमी येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर-३०० स्पर्धेचे आकर्षण निर्माण करण्यासाठी सायनाचे बॅनर लावण्यात आले होते. सायना आणि पी.व्ही. सिंधु यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेकडे दुर्लक्ष केल्याचा राग प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. भारतीय बॅडमिंटनपटू परदेशी भूमीवरील मोठ्या स्पर्धांच्या तयारीकडे अधिक लक्ष देतात आणि यामुळे ते देशाच्या प्रतिष्ठित स्पर्धांपासून दूर जात आहेत, असा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.
या स्पर्धेतून भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अंतिम क्षणी माघार घेतली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी विश्व विजेती पी. व्ही. सिंधूनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता महिला एकेरीत भारताची मदार मुग्धा अग्रेय हिच्यावर आहे. पुरुष गटातून युवा खेळाडू लक्ष्य सेनच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
सायना नेहवाल सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. मागील सहा स्पर्धेत तिचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाला विजयी लय अद्याप मिळालेली नाही.