हैदराबाद - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता गोपीचंद अकादमीत सराव करणार नाही. मंगळवारपासून सिंधू हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियमवर सराव करणार आहे. सिंधूच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली.
माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आणि सिंधुचे वडील पी. व्ही. रमणा यांनी स्पष्टीकरण दिले, की त्यांच्या मुलीने मानसिक कारणास्तव प्रशिक्षण ठिकाण बदलले आहे. गचिबोवली स्टेडियम जागतिक दर्जाच्या ठिकाणी खेळण्याचा अनुभव देते, असे रमणा यांचे म्हणणे आहे.
रमणा म्हणाले, ''सिंधू गोपीचंद यांच्यापासून विभक्त झालेली नाही. तिला ऑलिम्पिकच्या वातावरणात प्रशिक्षण घ्यायचे आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) यांना या बदलाची माहिती आहे.''
२५ वर्षीय सिंधुने अद्याप २०२१च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. परंतु ती ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचली आहे. ती कोरियन प्रशिक्षक पार्क ताय संग यांच्या देखरेखीखाली मंगळवारपासून सराव सुरू करेल.
किम जी ह्युन यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर ताय यांनी सप्टेंबर २०१९मध्ये त्यांची जागा घेतली. सिंधुने २०१९च्या ऑगस्टमध्ये स्वित्झर्लंडमधील बासेल शहरात झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
हेही वाचा - चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राचे नेतृत्व