मुंबई - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत हे दोघे बीडब्लूएफ वर्ड टूरच्या फायनलसाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी भारताची पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी व मिश्र दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि अश्विनी पोनप्पा फायनलसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले.
बीडब्लूएफ वर्ड टूर फायनल्ससाठी जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडू आणि जोड्या पात्र ठरतात. ही स्पर्धा डिसेंबर २०२० मध्ये होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता या स्पर्धेचे आयोजन पुन्हा करण्यात येणार आहे.
थायलंड ओपन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतची कामगिरी उल्लेखणीय नव्हती. परंतु, चीन आणि जपानच्या खेळाडूंनी कोरोनामुळे या स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे किदाम्बी श्रीकांतचा मार्ग सुलभ झाला. त्याचे नशिब जोरावर होते आणि तो फायनल टूरसाठी पात्र ठरला. जपानची नाओमी ओकुहाराने मागील तीन स्पर्धांमधून माघार घेतल्याने, सिंधूला देखील फायनल्स टूरचे तिकीट मिळाले.
बीडब्लूएफ वर्ड टूर फायनल्सच्यान अंतिम वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे. दरम्यान, स्पेनची स्टार महिला बॅडमिंटनपटू कॅरोलिन मरिनने थायलंड ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतपद पटकावले. तर विक्टर एलेक्सेन पुरुष एकेरीचा विजेता ठरला.
हेही वाचा - थायलंड ओपन : कॅरोलिना मरिन आणि व्हिक्टर एक्सेलसेन विजेते
हेही वाचा - VIDEO : विजयी फटका खेळताना बॅडमिंटनपटूचे तुटले रॅकेट