नवी दिल्ली - भारताची महिला बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी आणि फिजिओथेरपिस्ट किरण सी. यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एका आठवड्यापूर्वी या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हैदराबादच्या गोपीचंद अकादमीतील राष्ट्रीय शिबिरात सिक्कीने भाग घेतला होता. सिक्कीच्या चाचणीनंतर, ही अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद करण्यात आली होती.
चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर, हे शिबिर पुन्हा १७ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) याबाबत माहिती दिली. या दोघांसोबत त्यांच्या परिवारांच्या सदस्यांची चाचणीही निगेटिव्ह आली आहे. या चाचणीनंतर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक गोपीचंद म्हणाले, "शिबिरातील सहभागी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर, आम्ही एसओपीनुसार शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. अकादमीतील प्रशिक्षण सोमवार १७ ऑगस्टपासून सुरू होईल."
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधुव्यतिरिक्त सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, साई प्रणीत, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रेंकीरेड्डी यांनी शिबिरात भाग घेतला आहे.