फुजोऊ (चीन) - जगज्जेती पी. व्ही. सिंधू पाठोपाठ भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचेही चीन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सलामीच्या सामन्यात चीनची खेळाडू यान यान काई हिने सायनाचा पराभव केला. तर दुसरीकडे पुरुष गटात भारताचे पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणित यांनी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
चीनच्या फुजोऊ येथे शुरू असलेल्या चीन ओपन स्पर्धेच्या महिला गटातील पहिल्या फेरीत सायना सामना जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या चीनच्याच यान यान काईशी झाला. या सामन्यात यान हिने सायनाचा २१-९, २१-१२ अशा फरकाने एकतर्फी पराभव केला.
पुरुष गटात भारताचा पारूपल्ली कश्यपने उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानी असलेल्या कश्यपने २२ व्या स्थानी असलेल्या थायलंडचा सित्थिकोम थम्मसिन याचा २१-१४, २१-१३ अशा पराभव केला.
तर भारताचा दुसरा पुरूष बॅडमिंटनपटू साई प्रणित याने दिग्गज टॉमी सुगिअर्तोचा पराभव केला. रोमांचक ठरलेल्या सामन्यात त्याने थम्मसिनचा १५-२१, २१-१२, २१-१० अशा फरकाने पराभव केला. दरम्यान, साई प्रणित याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. यामुळे प्रणितकडून या स्पर्धेतही चमकदार कामगिरीची अपेक्षा होत आहे.
हेही वाचा - चीन ओपनच्या पहिल्याच फेरीत सिंधू गारद
हेही वाचा - फ्रेंच ओपन २०१९ : स्वप्न भंगलं, अंतिम सामन्यात सात्विक-चिराग जोडीचा पराभव