बासेल - भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची सलग तीन वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिचा अंतिम सामना जपानची खेळाडू नाओमी ओकुहाराशी होणार आहे. २०१७ च्या अंतिम फेरीत ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करत सुवर्ण पदक जिंकण्याची संधी सिंधूला आहे. सिंधूने जर ओकुहाराचा पराभव केला तर ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पहिली खेळाडू ठरेल.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने सलग तिसऱ्या वेळी प्रवेश केला आहे. यापूर्वी सिंधूने २०१७, आणि २०१८ मध्येही अंतिम प्रवेश केला होता. २०१७ मध्ये तिला ओकुहाराने तर २०१८ मध्ये तिला स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन हिने पराभूत केले होते.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजता सुरू होईल.
अंतिम सामन्यापूर्वी बोलतान सिंधू म्हणाली, की 'आता स्पर्धेतील एक सामना शिल्लक आहे. यावेळी मी सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. नोझोमी ओकुहारासमोर जिंकणे सोपे नसले तरी शांत, संयमी राहून खेळावर अधिक भर देत मला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.'