अहमदनगर - पोलीस बॅन्डची शानदार धून... पारंपरिक महाराष्ट्रीय ग्रामीण संगीताची मोहिनी... राजस्थानी नृत्याचा ठेका... आणि खेळाडूंच्या शानदार संचलनाने ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली.
क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय मिश्रा, अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अहमदनगरमध्ये ही स्पर्धा ५ दिवस रंगणार असून देशाच्या प्रत्येक भागातील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने येऊन या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत देशभरातून ३६ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा अद्यावत करण्यात आल्या आहे.
जिल्हा प्रशासन आणि स्थानिक बॅडमिंटन असोसिएशन यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. या राष्ट्रीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी बॅटमिंटन हॉलमध्ये ८ सिंथेटीक कोर्ट तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शहर आणि जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना या राष्ट्रीय खेळाडुंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.