सातारा - पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकल्याने एका कोरियन नागरिकाचा मृत्यू झाला. पाचगणी येथून उड्डाण केल्यानंतर अभेपुरी गावाच्या हद्दीत तो एका डोंगराला धडकला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी वाई मिशन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई येथून हा कोरियाचा नागरिक पाचगणी येथे आला होता. पॅराग्लायडिंग दरम्यान एका डोंगराला धडकून तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला वाई मिशन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.
अधिक तपास सहायक निरिक्षक बी. बी. येडगे करत आहेत. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोरियन दूतावसाचे अधिकारी वाईत आले होते. आज सकाळी त्या नागरिकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. परदेशी नागरिक असल्याने सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून मृतदेह संबंधिताच्या ताब्यात देण्यात आला.