मुंबई - कोरोनामुळे गेले पाच महिने पूर्णपणे ठप्प असलेला नाट्य व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी रंगकर्मीकडून आता प्रयत्न सूरू झाले आहेत. काहीही करून नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावेत यासाठी नक्की काय करता येईल याची आदर्श नियमावली तयार करण्यासाठी सगळेच एकवटले आहेत.
नुकतीच 'मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघा'च्या पुढाकाराने नाट्य परिषदेचा कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'यशवंत नाट्यमंदिर-दादर' येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत नाट्य व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला. त्यात शासन दरबारी यासंबंधी चर्चा करण्यासाठी 'विशेष समिती' गठीत करण्याचं एकमताने ठरविण्यात आले.
'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' यांच्याशी समन्वय साधून नाट्य व्यवसाय संदर्भात SOP नक्की करून शासनाशी बैठक लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक घटक संस्था यांच्याकडून समितीसाठी प्रत्येक संघटनेतील काही सदस्यांची नवे निश्चित करण्यात आली असून त्यांच्यामार्फत या विषयाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ - संतोष काणेकर, ज्ञानेश महाराव, राहुल भंडारे, देवेंद्र पेम, भरत जाधव, ऐश्वर्या नारकर.
कलाकार संघ - प्रदीप कबरे, शरद पोंक्षे, सुशांत शेलार, वंदना गुप्ते.रंगमंच कामगार संघ - रत्नकांत जगताप, संदीप नगरकर, किशोर इंगळे, प्रवीण गवळी, बापू सावळ, उल्लेश खांदारे, सतीश खवतोडे, रुचिर चव्हाण, आतिश कुंभार.
व्यवस्थापक संघ - प्रभाकर (गोट्या) सावंत, हरी पाटणकर, नितिन नाईक, नंदू पणशीकर. या सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात आल्याची माहिती व्यावसायिक नाट्यनिर्माता महासंघाचे अध्यक्ष संतोष काणेकर आणि कार्यवाह राहुल भांडारे यांनी प्रसारमाध्यमाना दिली आहे.