वॉशिंग्टन - हॉलिवूडचा ख्यातनाम निर्माता हार्वे विन्स्टन याला लैंगिक शोषणाच्या आणि रेपच्या आरोपाखाली न्यूयॉर्क न्यायालयाने दोषी घोषीत केले आहे. या निर्णयानंतर त्याने छातीत दुखत असल्याचे कारण सांगत न्यूयॉर्क रुग्णालय गाठले. ही माहिती विन्स्टनच्या वकिलांनी मीडियाला दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हार्वे विन्स्टन याला छातीत दुखणे, ह्रदयाची धडधड वाढणे आणि रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. आता त्याची प्रकृती बरी असून तो बाहेर आल्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
न्यूयॉर्क सुप्रिम कोर्टात सात पुरुष आणि पाच महिलांच्या एका ज्यूरीने जवळपास २६ तास विचार विनिमय केल्यानंतर हार्वे विन्स्टन याला दोषी ठरवले आहे.
कोर्टाचा हा निर्णय जगभर #MeToo मुव्हमेंटचा विजय म्हणून जगभर पाहिले जात आहे. हा निर्णय झाल्यानंतर हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आणि सेलेब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया देताना हा मोठा विजय झाल्याचे म्हटले आहे. ज्या महिलांनी उघडपणे आपली तक्रार दाखल केली त्यांचे कौतुकही सेलेब्सनी केले आहे.