मुंबई - प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते, असे बडेबुजुर्ग सांगतात. परंतु आपल्यावर इंग्रजांनी दीड-दोनशे वर्ष राज्य केल्यामुळे गोरी कातडी म्हणजेच सुंदरता हे मनावर बिंबवले गेले आहे. म्हणूनच बाजारात त्वचा गोरी करण्याऱ्या सौंदर्य प्रसाधनांना जोरदार मागणी आहे. नुकतीच मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंगला तिच्या सावळेपणावरून टोमणे खावे लागायचे. ‘तू काळी आहेस’ म्हणून तिला हिणवले जायचे, खासकरून जेव्हा तिच्या आजूबाजूच्यांना कळले की ती ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतेय. ‘मिस इंडिया किंवा मिस वर्ल्ड सारखा प्लॅटफॉर्म त्वचेच्या रंगावरून ‘ब्युटी’ ठरवत नसतो याची मला कल्पना होती. तसे असते तर प्रियांका चोप्रा मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होऊच शकली नसती. आणि या गोष्टीची मी खूणगाठ बांधून ठेवली होती त्यामुळे इतरांकडून कितीही कुचाळक्या केल्या गेल्या तरी मी माझं स्वप्न साकारण्यासाठी मेहनत घेतंच राहिले’, मान्या सिंगने सांगितले.
मराठीत एक म्हण आहे, ‘पांघरूण बघून पाय पसरावे’. तशाच प्रकारचा सल्ला मान्याची आई मनोरमा सिंग हिने आपल्या लेकीला अगदी सुरुवातीला दिला होता, जेव्हा तिला आपल्या मुलीच्या ‘मिस इंडिया’ स्वप्नाबद्दल कळले. परंतु जेव्हा तिने मान्याची जिद्द आणि ती घेत असलेली मेहनत बघितली तेव्हा तिने मान्याला पाठबळ दिले. मान्याचे वडील ओमप्रकाश सिंग एक रिक्षाचालक आहेत व त्यांच्या उत्पन्नावर चार जणांचा संसार चालतो. परंतु आता परिस्थिती बदलेल कारण त्यांची लाडकी लेक मान्या मिस इंडिया स्पर्धेत विजयी ठरली आहे. खरंतर मान्याचे आईवडील दोघांनाही आपल्या मुलीची काळजी वाटत होती. मान्याकडून एक चूक झाली होती ती म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी ती घरातून पळून गेली होती. मात्र तिचियी या यशाने समस्त मुलींच्या पालकांना एक धडा मिळेल की आपल्या मुलींवर विश्वास ठेवा व त्यांना नाउमेद करू नये.
मान्याला वाचनाची खूप आवड आहे परंतु पूर्वी परिस्थितीमुळे ती पुस्तके विकत घेऊ शकत नव्हती, ना कुठल्याही ग्रंथालयाचे शुल्क भरू शकत होती. मान्याला आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल कल्पना होती. त्यामुळे तिने घरातल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी धुणीभांडी देखील केली आहेत. तसेच कॉल सेंटरमध्ये रात्रपाळीत नोकरी सुद्धा केली. तिच्या ‘मिस इंडिया’ स्वप्नाबद्दल लोक तिला हिणवायचे, ‘आधी मिस मालाड तरी बनून दाखव’. तिचा प्रवास खडतर होता आणि विशेष म्हणजे मान्याला याची कल्पनादेखील होती. आईवडिलांनी दागिने गहाण ठेऊन तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि तिच्या कॉलेजमधील प्राचार्य, ट्रस्टी, विध्यार्थी या सर्वांनी मान्याचा सत्कार केला ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मिस इंडिया स्पर्धेआधी ती मॅनेजमेंट डिग्रीसाठी तयारी करत होती. तिचा शाळा कॉलेजमधील प्रवास, तिची पार्श्वभूमी, तिचे दिसणे, तिची भाषा यामुळे, कठीण होता परंतु यासर्वांवर मात करीत तिने जगाला दाखवून दिले की स्वप्नांमध्ये किती ताकद असते. आपले पालकच आपले विश्व आहे हे मान्याने पुन्हा सिद्ध केले जेव्हा तिने आपला मिस इंडियाचा मुकुट आई-वडिलांच्या डोक्यावर चढवला.
मेरी कॉम तिचा आदर्श असून तिचा जीवन-प्रवास मान्याला प्रेरित करतो. अनेक तरुणींप्रमाणे तिला शाहरुख खान प्रचंड आवडतो कारण तिच्यामते तो अंतरंगातून प्रेम व्यक्त करतो. कितीही उंचीवर गेले तरी पाय जमिनीवरच राहायला हवे, हे ती शाहरुखकडून शिकली असे मान्या सांगते. मान्याला मेक-अप, डिझाइनर, हेअर स्टाइलिंग आदींसाठी पैसे नव्हते त्यामुळे तिने स्वतःनेच हे सर्व केले त्यामुळेच तिच्या विजेतेपणाला महत्व आहे. तसेच पैसे वाचवण्यासाठी चालत जाणे, ऑडिशन्ससाठी हाय-हिल्स बॅगेत लपवून घेऊन जाणे आदी अनेक अशक्यप्राय गोष्टी करत मान्या सिंगने व्हीएलसीसी मिस इंडिया 2020 च्या उपविजेती पदाचा मुकुट पटकावून अनेकांसाठी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.