स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर किर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. किर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या किर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात हा आता भूतकाळ झाला आहे. आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत सण साजरे होताना दिसणार आहेत. बहिण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाने आपलं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत देखिल रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
परंतु प्रेक्षकांना हे ‘रक्षाबंधन’ वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. इथे कीर्तीने आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी तिच्या भावाने तिला राखी बांधलीय. कीर्तीचं शौर्य आणि तिच्या धाडसाच्या बऱ्याच गोष्टी आपण मालिकेतून पहात आलोय. नुकतंच तिने आपल्या कुटुंबाला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यातून वाचवत कौतुकाची थाप मिळवली. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधून फक्त कुटुंबाचंच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो. मालिकेतला हा प्रसंग देशातील नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल.
कीर्तीने आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. कीर्तीच्या या स्वप्नपूर्तीमध्ये तिला शुभमची कशी साथ मिळणार याची देखिल उत्सुकता आहे. त्यामुळे ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे यापुढील भाग अधिकाधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहेत. कीर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर, तर शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी साकारत आहे. अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी जिजी अक्काची भूमिका वकुबीने निभावली आहे. आदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या स्नुषा आहेत.
हेही वाचा - तापसी पन्नू व गुलशन देवय्या नैनितालमध्ये करताहेत 'ब्लर'चे शुटिंग