रियालिटी शोज करताना स्पर्धकांना आपापल्या कुटुंबियांपासून दूर राहावे लागते. बऱ्याचवेळा जीवघेणी स्पर्धा आणि जवळपास ‘आपलं’ कोणी नसणं यामुळे स्पर्धक निराश होत असतात. तसं बघितलं तर त्या त्या शोची टीम सर्वांची व्यवस्थित काळजी घेत असते परंतु एकटेपणामुळे काही स्पर्धक थोडे जास्तच भावुक होत असतात. आता कलर्सवरील लोकप्रिय शो 'डान्स दिवाने' मधील स्पर्धा अधिक रोमांचक होत असताना काही भाग्यवान स्पर्धकांना गोड सरप्राईज मिळणार आहे. दर आवठड्याला स्पर्धक त्यांच्या काही उल्लेखनीय परफॉर्मन्ससह परीक्षकांना प्रभावित करत आले आहेत. त्यांच्या अथक मेहनतीचे फळ म्हणून दोन भाग्यवान स्पर्धकांना व्हिडिओ कॉलवरून त्यांच्या कुटुंबांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
या शोमध्ये ३ गट आहेत, जनरेशन १, २ आणि ३. परंतु यातील दोनच गटातील फक्त दोनच स्पर्धकांना आपल्या कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळणार आहे. जनरेशन १ मधील सोमांश त्याच्या वडिलांकडून सरप्राईज कॉल मिळणारा पहिला भाग्यवान स्पर्धक होता. वडिल-मुलाने एकत्र उत्तम क्षणाचा आनंद घेतला. हे सरप्राईज अधिक मधुर करण्यासाठी सोमांशचे वडिल शोच्या सेटवर देखील आले. या तरूण डान्सरने त्याच्या वडिलांना मिठी मारली आणि त्याला त्याचे अश्रू अनावर झाले. यातील रोचक बाब म्हणजे सोमांशला वाटते की, त्याचे वडिल त्याच्यासाठी लकी चार्म आहेत. ज्यामुळे त्यांना भेटल्याने निश्चितच त्याला नशीबाची अधिक साथ मिळाली आहे.
या आठवड्यात डान्स दिवाने वर हृदयस्पर्शी घटनांसोबत काही धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेस सुद्धा बघायला मिळणार आहेत. जनरेशन ३ हा सर्वात कठीण गट आहे कारण वाढत्या वयाबरोबरच स्पर्धा जिंकण्याची ईर्षा वाढवत ठेवावी लागते. बरीच वर्ष कुटुंबासोबतच राहिल्यामुळे त्यांना ‘मिस’ न करणं जड जात असतं. जनरेशन ३ मधील पल्लवी ही दुसरी स्पर्धक होती, जी सादरीकरणानंतर तिचा पती विठ्ठलसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना खूपच भावूक झाली. विठ्ठलने कॉलवर कबूली दिली की, तो नेहमीच कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिच्यासोबत असू शकला नाही आणि याबाबत त्याने तिची माफी मागितली.
विठ्ठलने पल्लवीला प्रोत्साहन दिले आणि म्हणाला, ''मला तुझा खूप अभिमान वाटतो. मला माहित आहे की, मी स्वार्थी आहे आणि तुला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. पण तू अगदी या गोष्टीच्या विरूद्ध आहेस. तू अशी व्यक्ती आहेस, जी लोकांची काळजी करते. मी तुला कमी वेळ देण्यासाठी माफी मागतो. तू आता स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करणा-या इतर महिलांसाठी आदर्श ठरत आहेस.'' हे ऐकल्यानंतर पल्लवीच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले आणि तिने या सकारात्मकतेसाठी परीक्षकांचे आभार मानले.
‘डान्स दिवाने' हा डान्स रियालिटी शो दर वीकेण्डला रात्री कलर्सवर वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - मलायकासोबतचे डेटिंग आणि आईला सोडून श्रीदेवीशी लग्न केलेल्या बोनी कपूरबद्दल अर्जुनने केले भाष्य