'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'सन्नी दा'ची भूमिका साकारणारा राज हंचनाळे विवाह बंधनात अडकला आहे. सुत्रांच्या अनुसार, मुळची हरयाणाची असलेली मौली आणि मुळच्या कोल्हापुरच्या राजची भेट फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने मुंबईत झाली. 2013ला ‘दुष्यंत प्रिया’ नाटकाच्या निमित्ताने राज आणि मौलीची भेट झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सध्या मौली एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. तर राज मराठी मालिका विश्वात प्रसिध्द आहे.
नुकतंच 6 डिसेंबरला राज आणि मौली रत्नागिरीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. आपल्या या डेस्टिनेशन वेडिंगबद्दल राज सांगतो, “माझी आणि मौलीची इच्छा होती, समुद्राकिनारी लग्न व्हावं. मौलीच्या घरच्यांनाही समुद्रकिनारा पाहायची इच्छा होती. रत्नागिरीचा समुद्रकिनारा खुप सुंदर आहे. म्हणून तिथे लग्न केलं. लग्न कोणत्या ठिकाणी व्हावं हे ठरवण्यापासून ते लग्नासाठी फुलं आणि हार आणण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही स्वत: केल्यात. त्यामुळे लग्नाची तयारीच तीन ते चार महिन्यांची होती.”
लग्न झाल्यावर राज लगेच आपल्या मालिकेच्या चित्रीकरणात गुंतला. हनिमूनला जायलाही त्याला वेळ मिळाला नाही. याविषयी राज म्हणतो. “अगदी दोन दिवसाच्या सुट्टीत मी पटकन लग्न उरकलं. माझ्या मालिकेतल्या कलाकारांनाही बोलवता आलं नाही. चित्रीकरणासाठी अगोदरच डेट दिल्या असल्याने तीन महिने तरी सुट्टी घेऊन हनिमुनला जाता येणार नाही. मार्चलाच आता हनिमुनला जाता येईल.”