मुंबई - जेव्हापासून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रसारित होऊ लागली आहे, तेव्हापासून प्रेक्षक त्यात गुंतत चालले आहेत. मालिकेतील वातावरण भारावून टाकणारे आहे. मात्र, इतिहासकालीन पोशाखही सर्वांना आवडत आहेत. या सर्वांमध्ये आहे एक पिटुकला प्रेक्षक जो ज्योतिबाचा खूप मोठा फॅन आहे, तो घरात ज्योतिबासारखा वागायचा प्रयत्न करतो व त्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती ‘ज्योतिबा’ ला भेटण्याची.
कर्मधर्मसंयोगाने तो चिमुकला चाहता ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या सेटवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते. यावरून सिद्ध होते की स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे, याचीच पोचपावती देणारा हा प्रसंग होता.
या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता, ‘अश्या चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका लहान मुलांनाही आवडते आहे, याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होते आणि ते त्यांने आम्हा सर्वांसमोर सादर केलं. प्रेक्षकांचे हे प्रेम असेच राहो अशी भावना विशालने व्यक्त केली.’