नुकताच हिंदीतील 'बिग बॉस’ च्या नवीन पर्वाचा शुभारंभ झाला आणि त्यापाठोपाठ आता ‘बिग बॉस मराठी’ च्या प्रदर्शनाचीही तारीख ठरली आहे. जगभरात चर्चेत असणारा, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस मराठी”. कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिग बॉस चा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची यारी-दोस्ती, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता हे घर पुन्हा एकदा सज्ज आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी.

पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी’ येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला. ते घर येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एंटरटेनमेंट सेक्टरला बसलेल्या टाळ्याला अनलॉक करायला. प्रेक्षकांच्या लाडक्या बिगबॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचे सूत्रसंचालन सर्वांचे लाडके महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. खरंतर महेश मांजरेकर नुकतेच हॉस्पिटलची वारी करून घरी परतले आहेत आणि तरीही त्यांनी प्रोमो-शूटला नाही न म्हणता ते पूर्ण केले यात त्यांच्यातील सकारात्मक दृष्टिकोन उठून दिसतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या नव्या सिझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते सेलिब्रिटीज असतील याबाबतचे तर्कवितर्क सुरु झाले आहेत. अर्थातच ‘ते’ कोण कोण असतील हे लवकरच कळेल. बिग बॉस मराठीच्या घरात तिसऱ्या सिझनमध्ये कोण असणार, कसे असणार यावेळेसचं घरं इत्यादी गोष्टींवरील पडदा उठेल येत्या १९ सप्टेंबरला.

बिग बॉस मराठी – Unlock Entertainment १९ सप्टेंबरला संध्या ७.०० वा. आणि नंतर दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होण्यास सुरुवात होईल.