कलर्स मराठीवर ‘सूर नवा ध्यास नवा’ चा नवीन हंगाम येऊ घातला आहे. यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या आहेत. यात स्पर्धकांनी अप्रतिम गायकी सादर केली आणि त्यातूनच महाराष्ट्राला मिळाल्या आहेत उत्कृष्ट १६ गायिका. या १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द. महत्वाचे म्हणजे हे पर्व फक्त महिलांसाठीच असून महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्राची ‘आशा उद्याची’.
‘सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची’ या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता आणि आता त्याचा ग्रँड प्रीमियर होऊ घातला आहे. कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियर मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे. त्यासोबतच कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणारा जज अवधूत गुप्ते सुद्धा आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अवधूत गुप्ते नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून सर्वांची मने जिंकणार आहे.
याच सोबत आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र सुद्धा गाणी सादर करणार आहे. आपल्या गोड आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सावनी रविंद्रला ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला असून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर तिचा सत्कार करण्यात आला.
‘सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची’ या सांगीतिक कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर येत्या रविवारी म्हणजेच ११ एप्रिल रोजी संध्या ७.०० वा प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - आमिर खानची मुलगी इरा करतेय मराठमोळ्या नुपुर शिखरेशी डेटिंग