कोरोना हा एकदम नवीन रोग असून तो ‘जीवघेणा’ असल्यामुळे त्यापासून संरक्षण करण्यासाठी लस निर्माण करण्यात आली. देशभरात जागोजागी लसीकरण केंद्रे उभारून वयोमानाप्रमाणे लसीकरणाचा प्रोग्रॅम आखला गेला. मुंबईतही मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले असून अजूनही अनेकांना लस देणे बाकी आहे. कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी जागोजागी तात्पुरती लसीकरण केंद्रे उभाण्यात येत असून यात सेलिब्रिटीजही सामाजिक सेवेसाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच गायक सोनू निगम, गोल्फपटू क्रिशिव टेकचंदानी आणि मनीष सिधवानी यांनी पुढाकार घेत चेंबूरमधील बसंत पार्क येथे कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते.
![Sonu Nigam conducted covid vaccination campaign in Chembur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sonu-nigam-organises-vaccination-drive-at-chembut-mhc10001_29052021194618_2905f_1622297778_710.jpeg)
"आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. समाजातील प्रत्येक घटकाकडून जमेल तशी मदत गरजू लोकांना केली जात आहे. कलाकार म्हणून भारतीयांनी नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. आणि या पुढेही देतील म्हणून मी संकटाच्या काळात माझ्याकडून छोटी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे", अशी भावना सोनू निगम यांनी यावेळी व्यक्त केली.
![Sonu Nigam conducted covid vaccination campaign in Chembur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sonu-nigam-organises-vaccination-drive-at-chembut-mhc10001_29052021194618_2905f_1622297778_710.jpeg)
या आधी सोनू निगम आणि क्रिशिव यांनी मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेंटरचे वाटप केले होते. त्यानंतर आज त्यांनी या लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घेतला. यावेळी भाजप खासदार मनोज कोटक आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी या लसीकरण मोहिमेसाठी प्रमुख उपस्थिती लावली होती.
![Sonu Nigam conducted covid vaccination campaign in Chembur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sonu-nigam-organises-vaccination-drive-at-chembut-mhc10001_29052021194618_2905f_1622297778_996.jpeg)
"कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक आहे", अशी प्रतिक्रिया खासदार मनोज कोटक यांनी दिली. तसेच "आज कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने मोठ्या संख्येने अशा लसीकरण मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे", असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
![Sonu Nigam conducted covid vaccination campaign in Chembur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sonu-nigam-organises-vaccination-drive-at-chembut-mhc10001_29052021194618_2905f_1622297778_330.jpeg)
चेंबूरमधील बसंत पार्क येथे कोविड लसीकरण मोहिमेत पात्र नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा - वसुंधराप्रेमी सोनाक्षी सिन्हाला सोनी बीबीसी अर्थकडून मिळाला ‘अर्थ चॅम्पियन' सन्मान!