मुंबई - जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली बेंद्र आणि इम्रान हाश्मीचा मुलगा अयान हाश्मी हजर होते. यावेळी कॅन्सरशी लढणाऱ्या व्यक्तींची हिंमत वाढावी यासाठी माहिती दिली.
सोनाली म्हणाली, ''कॅन्सर हा अनुवांशिकही असू शकतो. त्यामुळे आपल्या घरात अगोदर कुणाला हा दुर्धर आजार झाला होता का याची माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. अनुवांशिक असेल तर त्याची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. कारण यातून आपल्या समाजाला मोठी मदत होऊ शकते.''
इम्रान हाश्मीचा मुलगा अयान हाश्मी १० वर्षांचा आहे. यावेळी तो म्हणाला, ''कॅन्सर अनेक अर्थाने भयानक आहे. परंतु कसे मजबूत आणि खूश राहून आनंदीत जीवन जगायचे हे कॅन्सरने मला भरपूर शिकवले आहे. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा मी घाबरलो होतो. कॅन्सर बरा होऊ शकतो. आपल्या मानसिकतेला बदला आणि इलाज करा. हिंमत हारुन चालणार नाही. कारण कॅन्सरचा इलाज होऊ शकतो.''
सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाला होता. यावर तिने न्यूयॉर्कमध्ये जाऊन इलाज केला होता. त्यानंतर ती लाखो फॅन्ससाठी प्रेरणादायी ठरली. अयान हाश्मीला २०१५ मध्ये तीन वर्षाचे असताना किडनी कॅन्सर झाला होता.