मुंबई - 'थप्पड से डर नही लगता साहब प्यार से लगता है', या डायलॉगने पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झालेली सोनाक्षी सिन्हा हिचा आज वाढदिवस. 'दबंग' चित्रपटातून तिने सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात येण्यापूर्वी ती एक फॅशन डिझायनर होती. आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये तिचे नाव आहे. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. तिचे बरेच ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. मात्र, चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी तिचा लूक पूर्णत: वेगळा होता. तिचे सुरुवातीचे फोटो पाहून क्षणभर ही सोनाक्षी आहे, हा विश्वासही बसत नाही.
सोनाक्षी सिन्हाचे सोशल मीडियावर तब्बल १४.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. एकवेळ अशी होती, की सोनाक्षीचे वजन ९० किलोपेक्षा जास्त असायचे. त्यावेळी तिला स्वत:लाही वाटले नव्हते की ती ग्लॅमरच्या क्षेत्रात पाऊल ठेवेल.
सोनाक्षीने आत्तापर्यंत 'दबंग', 'रावडी राठोड', 'सन ऑफ सरदार', 'बॉस', 'हॉलीडे', 'तेवर' आणि 'नूर, यांसारख्या बऱ्याच चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान गाजले.
सोनाक्षीने अलिकडेच 'कलंक' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची भूमिका अगदीच लहान होती. आदित्य रॉय कपूरच्या पत्नीच्या रूपात ती झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता सोनाक्षी 'दबंग -३' चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खानसोबत भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.