छोट्या पडद्यावरील हँडसम हंक समजला जाणारा सिद्धार्थ शुक्ला आता एका वेब सिरींजमधून प्रेक्षकांना भेटायला येतोय. ‘बिग बॉस १३’ च्या प्रसारणादरम्यान आणि नंतर सिद्धार्थची लोकप्रियता प्रचंड वाढली. ‘तो सध्या काय करतो’ असे प्रेक्षक विचारात आहेत आणि त्याचे उत्तर म्हणजे तो ऑल्ट बालाजीचा लोकप्रिय शो 'ब्रोकन बट ब्युटीफुल’ च्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसणार असून त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिद्धार्थची आकर्षक पर्सनॅलिटी, त्याचे मोहक मदहोश करणारे स्माईल आणि सहज अभिनय शैलीमुळे तो प्रेक्षकांचा लाडका आहे. आधी लोकप्रिय मालिका आणि नंतर बिग बॉस व खतरों के खिलाडी यासारख्या कार्यक्रमांत भाग घेतल्यानंतर तर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे आणि मनोरंजनविश्वात त्याला प्रचंड मागणी आहे.
छोटा पडदा आणि ओटीटी माध्यमात काम करण्याच्या अनुभवावर आपले विचार मांडताना सिद्धार्थ म्हणाला, "मला कल्पना आहे की संपूर्ण जग वेब प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहे आणि मला वाटते की हे आता एक नवीन माध्यम आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन नंतर, जेव्हा सर्वजण घरातच कैद होते व मनोरंजनासाठी चित्रपट वा मालिका उपलब्ध नव्हत्या, लोकांचे ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल आकर्षण वाढले, तिथल्या वैविध्यपूर्ण कन्टेन्टमुळे. यामुळे अनेक छोटे-मोठे कलाकारही या माध्यमाशी जुळवून घेत आहेत. महत्वाचं म्हणजे इथे, बॉक्स ऑफिस बद्दलचं भय विसरून, वेगवेगळे प्रयोग करता येतात.”
तो पुढे म्हणाला, "दोन्ही माध्यमांना स्वतःची आव्हाने आहेत. आम्ही कलाकार दोन्ही माध्यमांवर सारखीच मेहनत घेतो. इथे ‘कन्टेन्ट इज किंग’ असते आणि तुम्ही चांगलं काम केलं की प्रेक्षक आपसूक तारीफ करतात. तुमचे काम चोख असायला हवे. ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ मधून मी वेबविश्वात पदार्पण करतोय आणि त्याबद्दल खरोखरच उत्साही आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पहात आहे."
11:11 प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित आणि प्रियंका घोष दिग्दर्शित 'ब्रोकन बट ब्युटीफुल ३' अगस्त्य आणि रुमी यांच्या नात्यातील चढ-उतार दर्शविते, ज्यांची उत्कटता एकमेकांत समरसून जाते. या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी सोबत एहान भट, जाह्नवी धनराजगीर, मनवीर सिंग, तान्या कालरा आणि सलोनी खन्ना महत्वपूर्ण भूमिकांत आहेत.
ऑल्ट बालाजी चा ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३' येत्या २९ मे २०२१ पासून स्ट्रीमिंग साठी उपलब्ध असेल.
हेही वाचा - द फॅमिली मॅन २' चे प्रसारण थांबवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार - वायको