नुकतेच बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव उगाचच एका कॉंट्रोव्हर्सीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्याला त्याने खरमरीत प्रत्युत्तराची दिले. श्रेयस बऱ्याच अवधीनंतर मराठी मालिकेमध्ये पुनःपदार्पण करीत आहे. त्याच्यासोबत हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत लीलया वावरणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सुद्धा मराठी मालिकेमध्ये पुनःपदार्पण करीत आहे.
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेचे प्रोमोज तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी टेलिव्हिजवर पदार्पण करतेय. या दोघांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यामुळे चाहते प्रेक्षक यांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
![श्रेयस तळपदे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mazi-tuzi-reshimgath-shreyas-talpade-mhc10001_17082021014345_1708f_1629144825_597.jpeg)
श्रेयस तळपदे म्हणाला, "ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप खास आहे. १६ वर्षांपूर्वी इक्बाल हा माझा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला जो माझ्या कारकिर्दीत एक माईलस्टोन ठरला आणि मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही वर्षांपूर्वी मी प्रोड्युस केलेला पोश्टर बॉईज देखील याच महिन्यात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. आता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक अनोखी प्रेम कथा आहे आणि या मालिकेला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे."
श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून गोंडस मायरा व हँडसम श्रेयस आणि सुस्वरूप व नटखट प्रार्थना यांच्या जबरदस्त व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहेत.
मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "ती सेट वर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी मायरा सोबत रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं कि मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे कि मी तिला एक दिवस सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे."
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवीन मालिका २३ ऑगस्ट पासून झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - 'फॅक्टरी' टिझर रिलीज : आता तरी मिळणार का आमिर खानच्या 'सख्ख्या' भावाला यश?