कोरोना काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यावेळी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत लॉकडाऊन उघडण्यात आला होता. आता मालिकांचेही ‘पुनश्च हरिओम’ होताना दिसतेय. कुठल्याही चांगल्या गोष्टीचा कधीनाकधी अंत होतोच या उक्तीप्रमाणे अत्यंत लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावरच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. आता त्याचा दुसरा भाग येत आहे हे आधीच घोषित करण्यात आलं होतं.

निर्मात्या व अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी नुकतीच सोशल मीडियावरून झी मराठी प्रस्तुत आणि वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस २' च्या चित्रीकरणाची मुहुर्तमेढ रोवली. 'देवमाणूस' या झी मराठी वरील एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावरील टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. त्यामुळेच आता 'देवमाणूस’ पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ ची प्रेक्षकांना उत्सुकता होतीच त्यामुळे आता 'देवमाणूस २' या दुसऱ्या सीजनमध्ये नक्की काय दाखवण्यात येणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'देवमाणूस २' चे चित्रीकरण सुरू झाले असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज होत आहे, झी मराठीवर.
हेही वाचा - Imdb 2021 : अभिनेत्री सई ताम्हणकर ठरली ब्रेकआऊट स्टार