भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नसून धर्म मानला जातो. त्यामुळेच जेव्हा आयपीएल सारखी टी-ट्वेंटी क्रिकेट लीग सुरु झाली तेव्हा त्याला क्रीडाप्रेमींचा प्रचंड पाठिंबा मिळाला. त्याच धर्तीवर अनेक छोट्यामोठ्या क्रिकेट स्पर्धा भरू लागल्या. त्यातीलच एक म्हणजे ‘शेलार मामा फॉउंडेशन’ ची मराठी क्रिकेट लीग.
‘शेलार मामा फॉउंडेशन’ च्या सहकार्याने रंगलेल्या मराठी क्रिकेट लीग या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे यांचा संघ विजयी ठरला तर नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांचा संघ उपविजेता ठरला. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या लीग मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या १३ संघांचा समावेश होता. मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यकलाकारांसाठी आयोजित ‘मराठी क्रिकेट लीग’ नुकतीच दिमाखात संपन्न झाली. अभिनेता सुशांत शेलार यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले.
कोविड काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या लीगसाठी निर्माती श्रेया योगेश कदम यांची उपस्थिती सर्व कलाकारांना मार्गदर्शक राहिली. या कठीण काळात या सर्व नर्तकांना मदतीचा हात मिळावा यासाठीसुद्धा शेलार मामा फॉउंडेशनने पुढाकार घेतला. गरजू नृत्यकलाकारांसाठी रेशन कीट उपलब्ध करून देण्यात आले.
“केवळ कोरोना काळापुरती ही मदत नसून ‘मराठी क्रिकेट लीग कमिटी’ नृत्यकलाकारांना नेहमीच सहकार्य करीत राहील. तसेच त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील”, असे अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा - तालिबानबद्दलच्या पोस्टनंतर इन्स्टाग्राम हॅक, आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा कंगनाचा दावा