मुंबई - एका वृत्तवाहिनीने अध्ययन सुमनने आत्महत्या केल्याची खोटी बातमी प्रसारित केली होती. यामुळे बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन भडकला आहे. आपला मुलगा अध्ययन याच्याबद्दल खोटी बातमी देणाऱ्या या वृत्त वाहिनीच्या विरोधात त्याने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेक्षकांना मसालेदार बातमी देण्यासाठी अनेक वृत्त वाहिन्या बनावट बातम्या चालवतात. अशाच पध्दतीने एका वृत्त वाहिनीने आपल्या ऑनलाईन आवृत्तीत शेखर सुमनचा मुलगा अध्ययन याने आत्महत्या केल्याची बातमी दिली. नंतर चूक लक्षात आल्यानंतर वाहिनीच्या वतीने शेखर सुमन यांची माफी मागण्यात आली. कायदेशीर कारवाई न करण्याची विनंतीही वाहिनीने शेखर यांच्याकडे केली. मात्र या भयंकर बातमीमुळे शेखर सुमन भडकले आहेत. त्यांनी या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेखर सुमन यांनी आपला संताप एका ट्विटद्वारे व्यक्त केलाय. ''मालकांना थोडी लाज वाटली पाहिजे. अशी बातमी जर एखाद्या मोठ्या राजकीय गटातील व्यक्तीबाबत असती तर कल्पना करा'', असे त्यांनी म्हटले आहे.
ही बनावट बातमी छापली गेली तेव्हा अध्ययन दिल्लीत होता. त्याच्याशी संपर्क होईपर्यंत आपल्यावर आणि पत्नीवर कोणता प्रसंग ओढवला असेल असे एका वेब्लॉइडशी बोलताना शेखर सुमन यांनी सांगितले.
"जेव्हा माझी पत्नी अलका आणि मी हे ऐकले तेव्हा आम्ही सुन्न झालो. अध्ययन दिल्लीत होता आणि त्याचा फोन लागत नव्हता. त्याच्याशी संपर्क होईपर्यंत आम्ही हजारवेळा मृत झालो होतो. माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे असे जगाला जाहीर केले गेले... ते अगदीच निषेधार्ह आहे. मी आणि माझ्या पत्नीने काय भोगले असेल याची आपण कल्पना करू शकता." असेही शेखर म्हणाले.
त्याच्या तब्येतीबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना, अध्ययनने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खात्री दिली की आपण सुखरुप असल्याचे सांगितले.
२० फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीने वृत्तपत्रात बातमी दिली आहे की, कामासाठी दिल्लीत आलेल्या अध्ययन सुमनने आत्महत्या केली.
हेही वाचा - वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दिशेने रवाना, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी