मुंबई - ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी म्हणजेच शरयू सोनावणे एक उत्तम नृत्यांगना असून तिचा अभिनय प्रवास सुरु झाला याच मालिकेतून. ही मालिका स्टार प्रवाह वर नुकतीच सुरु झाली असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शरयू सोनावणे या मालिकेत पिंकी ही प्रमुख भूमिका साकारत असून तीही प्रेक्षकांची लाडकी बनत चालली आहे.
शूटिंग साताऱ्यात
शूटिंगच्या अनुभवाबद्दल शरयू म्हणाली की, “मी मूळची मुंबईची आहे आणि शूटिंग साताऱ्यामध्ये सुरु आहे. सहकलाकार आणि आमचे दिग्दर्शक मला खूप समजून घेतात. पिंकी हे पात्र उभं करण्यात आमच्या संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. सेट हे जणू माझं दुसरं घरच आहे. माझ्या लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत मी सेटवर खूप धमाल करते. त्याच्यावर ताईगिरी दाखवतानाच भावाच्या मायेने प्रेमही करते. त्यामुळे मला नवं कुटुंब मिळालंय असंच वाटतं.”
पिंकी होती हेमामालिनीच्या बॅलेमध्ये डान्सर
ती पुढे म्हणाली की, “मला नृत्याची प्रचंड आवड आहे. मी भरत नाट्यम शिकले आहे. डान्सच्या निमित्ताने माझे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात. मी ड्रीमगर्ल हेमामालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायचे ज्यात मी नृत्यामधून कृष्ण साकारला आहे. हा अनुभव थक्क करणारा आहे. माझी ही नृत्याची आवड मला पिंकी हे पात्र साकारताना देखिल उपयोगी पडते आहे. डान्सचे अनेक सिक्वेन्स आम्ही मालिकेत शूट केले आहेत जे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच मजा येईल.”
हेही वाचा - Fulrani Movie Release : दिग्दर्शक विश्वास जोशी आणि सुबोध भावे सोबत 'फुलराणी' दिवाळीत!