सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादल्या गेलेल्या दुसऱ्या लॉकडाऊन च्या काळातही प्रेक्षकांचे मनोरंजन अबाधित राहावे याची दक्षता अनेक मालिका निर्मात्यांनी घेतली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेच्या निर्मात्यांनीसुद्धा हीच खबरदारी घेतलीय. महाराष्ट्रात शुटिंग्सना बंदी घातली गेल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राबाहेर चंबूगबाळे हलवत नवीन भागांचे चित्रीकरण सुरु ठेवले.
'तू सौभाग्यवती हो' ही मालिका फारच कमी काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.
सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे काय काय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
सोनी मराठी वाहिनीवर'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत १ जूनपासून विवाह सप्ताह साजरा होतोय.
हेही वाचा - संजय दत्त ठरला पहिला बॉलिवूडकर ज्याला मिळाला संयुक्त अरब अमारतीचा ‘गोल्डन व्हिसा’!