‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजचा दुसरा भाग अलिकडे नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करीत होते. या भागाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असल्यामुळे उत्कंठा वाढली होती. सध्या मात्र ‘सेक्रेड गेम्स २’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे.
या वेब सीरिजमधील एका सीनमुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार भाजपाने केली आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी अनुराग कश्यप यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सैफ अली खान या वेबसिरीजमध्ये सरताज ही व्यक्तीरेखा साकारत आहे. शीख धर्मिय असलेला सरताज एका सीनमध्ये हातातील कडे समुद्रात फेकून देतो. या सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे.
‘हातातले कडे शिख धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. आदर आणि विश्वासाने ते हातात घातले जाते, असे तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अकाली दलाचे आमदार मन्जिंदर सिंग सिरसा यांनीही अनुराग कश्यपच्या विरोधात आपला संताप व्यक्त केलाय. बॉलिवूड नेहमीच आमच्या धार्मिक प्रतिकांचा अनादर करते. अनुराग कश्यप यांनी जाणीवपूर्वक हा सीन 'सेक्रेड गेम्स २' मध्ये घातलाय. सैफ अली खान त्याचा कडा समुद्रात फेकून देतो. कडा हा काही किरकोळ गोष्ट नाही. कडा हा गुरु साहिबांचे आशीर्वाद आणि शीख धर्मियांचा अभिमान आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलंय.