मुंबई - ‘कलाश्रम’ या संस्थेच्यावतीने जानेवारी महिन्यातील दिग्गज दिवंगत व्यक्तीला प्रत्यक्ष कलाकृतीतून आदरांजली वाहिली जाते. या महिन्यात कवी, लेखक नामदेव ढसाळ यांना गायक, गीतकार सतीशचंद्र मोरे ‘स्वरमयी आदरांजली’ वाहणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम अपराज, दखलपत्राचे वाचन शैलेश निवाते, मोनाली घोलप, निलेश नाईक, लक्ष्मी कुशाले हे कलाश्रमचे सदस्य करणार आहेत. आदर्श शिक्षिका सुविद्या तळेकर यांच्या नावाने ‘माँ तुझे सलाम’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. शोभा गांगण आणि विभावरी खरडे हे विजयी स्पर्धक आहेत.
![नामदेव ढसाळ यांना ‘स्वरमयी’ आदरांजली!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-kalashram-musical-honour-to-poet-namdev-dhasal-mhc10001_25012022144437_2501f_1643102077_862.jpeg)
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कलाकेंद्र अंतर्गत कार्य करणार्या ‘कलाश्रम’ या संस्थेच्यावतीने ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला आयोजित करण्यात येतो. शुक्रवार २८ जानेवारी २०२२ सायंकाळी ७ वाजता होणारा कार्यक्रम हा संस्थेचे बेचाळीसावे पुष्प असून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी इथे होणार आहे. लेखक, दिग्दर्शक कुमार सोहनी प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते ‘कणखर’ पुस्तकाचे प्रकाशन आणि दखलपत्रांचे वितरण होणार आहे.
जानेवारी महिन्यात दिवंगत झालेले अभिनेते, निर्माते आनंदा नांदोसकर, आदर्श गृहिणी व सुगरण मंदाकिनी राणे, बॅन्जो मास्टर गिरिधर जाधव, कामगार कार्यकर्ते विठ्ठल नार्वेकर यांच्या नावाचे दखलपत्र अभिनेता, दिग्दर्शक संजीव चव्हाण, घरोबाच्या संचालिका उर्मिला पडवळ, बॅन्जो कारागिर व शिल्पकार राहुल तारी आणि जनसंपर्क अधिकारी व कार्यकर्ते विलास चौकेकर यांना देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे समन्वयक मृण्मयी मोडक असून कवी, गीतकार दीपक कांबळी हे या स्पर्धेचे परीक्षक होते. नंदकुमार पाटील यांनी ‘कणखर’ या पुस्तकाचे संपादन केले असून हर्षवर्धन राऊत यांनी त्याचे संकलन केले आहे. हा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करीत भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी फक्त विजेते स्पर्धक, पाहुणे व कलाश्रमचे सदस्य यांनाच प्रवेश दिला जाणार आहे असे कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - कॅटरिना कैफने मालदीवमध्ये बनवले नवीन मित्र पाहा व्हिडिओ