मुंबई - १ मेला साज-या केल्या जाणा-या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दोन पुस्तकांचे ऑडिओ रूपांतर रोहन प्रकाशनाच्या सहकार्याने 'स्टोरीटेल'वर सादर झाले. यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र 'कृष्णाकाठ' आणि त्यांनी विविध प्रसंगांच्या निमित्ताने दिलेल्या भाषणांचा संग्रह असणारे 'भूमिका' ही दोन्ही पुस्तके सुप्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रातून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजतो. तसेच ग्रामीण भागातील तरूणांना सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणाही मिळते. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातून कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात करून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंगलकलश आणण्याचा मान मिळवणारे आणि भारताच्या उपपंतप्रधानपदी पोहचणारे यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील आणि केंद्रातील कारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे.
'भूमिका' या पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. ही भाषणे ऐकताना महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचे यशवंतराव यांचे चिंतन आणि विचार किती दूरगामी होते याचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक विकासावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल भूमिका घेताना हे पुस्तक मार्गदर्शनपर ठरते.