हल्ली भारतातील कानाकोपऱ्यात असलेलं ‘टॅलेंट’ रियालिटी शोजच्या माध्यमातून सर्वांसमोर येते. ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’ हा छोट्यांसाठीचा म्युझिक रियालिटी शो ही याला अपवाद नाही, फक्त हा कार्यक्रम मराठी असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभा प्रेक्षकांसमोर येते. झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे.
सारेगमपचा हा मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'चा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.
या छोट्या पंचरत्नांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे कमलेश भडकमकर आणि त्यांचा वादक मित्रांची. निलेश परब यांची ढोलकी, अमर ओक यांची बासरी, अर्चिस लेलेंचा तबला, सत्यजित प्रभू यांचा सिंथेसायजर, या मंडळींनी ही वाद्य वाजवायला घेतली की कानसेनांचे कान तृप्त व्हायचे. जणू ती वाद्य आपल्याशी बोलत आहेत असे प्रेक्षकांना वाटे. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली तसेच त्यांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकताही मिळवली.
आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास १२ वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरात सुरु झाली. यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत, हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या ‘पंचरत्न’ कलाकारांनी आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या स्वागताची कलाकारांची ही अनोखी पद्धत प्रेक्षकांना खूपच भावली. त्यांच्या या पोस्ट्सवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करणार आहे. ह्या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ २४ जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री झी मराठीवर प्रसारित होईल.
हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश