मुंबई - टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली आहे.
'बिग बॉस १३' मध्ये रश्मी सर्वांनाच एन्टरटेन करीत होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचलेल्या रश्मीने आपला कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे.
एका व्यक्तीने तिचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या म्हणण्यानुसार ती १६ वर्षांची होती. त्यावेळी ती मनोरंजन जगतात नवखी होती.
एका आघाडीच्या पोर्टलशी बोलताना रश्मी म्हणाली, ''तू जर कास्टिंग काउचमधून गेली नाहीस तर तुझे काम होणार नाही, हे सांगितल्याचे मला आजही आठवते. त्या व्यक्तीचे नाव सूरज होते, आता तो कोठे आहे ते मला माहिती नाही. तो जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने मला स्टॅटिस्टिक विचारले. त्यावेळी याचा अर्थ मला माहिती नव्हता. मला माहिती नाही म्हटल्यावर त्याने ओळखले की, मी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. तो पहिला व्यक्ती होता ज्याने माझा फायदा घेण्याचा आणि माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला होता.''
रश्मीच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीने तिला ऑडिशनच्या निमित्ताने बोलावले होते आणि दारू पाजून शोषण करण्याचा प्रयत्न केला होता.
ती म्हणाली, ''एके दिवशा त्याने मला ऑडिशनला बोलावले. मी खूप उत्साहात होते. मी पोहोचले पण तिथे त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. तिथं कॅमेराही नव्हता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचे औषध घालून मला बेशुध्द करण्याचा प्रयत्न केला. मला असे काही करायचे नाही, हे मी सांगत होते. पण तो माझ्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. जवळपास अडीच तासाने मी तिथून कशीबशी निघाले आणि घरी येऊन सर्व आईला सांगितले.''
रश्मीने आईला सांगितले की, तिला या इंडस्ट्रीत काम करायचे नाही. आईने त्या व्यक्तीला फोन केला आणि रेस्टॉरंटमध्ये बोलवून घेतले आणि त्याला थप्पड मारली.
रश्मी म्हणते, ''आईने त्याला झापत सांगितले, यापुढे माझ्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास याद राख, ही एक छोटी सुरूवात आहे. पुढच्या वेळी मी तुला ठीक करेन.''
रश्मी देसाईने आपल्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष सर्वांसमोर ठेवला. सिनेजगतात अशा गोष्टींना थारा मिळू नये अशी अपेक्षा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण बाळगूया.