नुकताच छोट्या पडद्यावर आलेला ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. यात जेष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर सुद्धा सूत्रसंचालन करताना दिसतोय. पुष्कराज चा स्वभाव गमत्या असून त्याच्यामुळे कार्यक्रमात कॉमेडीचा तडका मिळेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमात त्याच्या सहभागाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “टिपिकल सूत्रसंचालन न करता काही तरी वेगळं करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी मी ह्युमर चा वापर करणार आहे आणि कुटुंबं व कार्यक्रमाला जोडणाऱ्या प्रेक्षकांच्या भावना यांचा यात मेळ असेल.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रोमोजमधून ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाचं स्वरूप खूपच वेगळं दिसतंय आणि त्यासंदर्भात पुष्कराज चिरपुटकर ला विचारले असता तो म्हणाला, “खरं आहे. ‘बँड बाजा वरात’ चं स्वरूप खूपच वेगळं आहे. रिऍलिटी शो म्हटलं की आपल्याला गाणं किंवा डान्सची स्पर्धा डोळ्यासमोर येते पण या कार्यक्रमात लग्न ठरलेली जोडपी आणि त्यांची कुटुंबं सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे, त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळले जातील आणि विजेत्यांना बक्षिसं मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमाला आपण प्री-वेडिंग धमाल असं म्हणू शकतो.”
आधीच सांगितल्याप्रमाणे ‘बँड बाजा वरात’ चे सूत्रसंचालन रेणुका शहाणे सुद्धा करीत असून त्याबाबत पुष्कराज ला विचारले असता तो म्हणाला, “आमची टीम एकदम ‘सॉलिड’ आहे. रेणुका ताईची या कार्यक्रमात एक महत्वपूर्ण भूमिका आहे. ती अभिनेत्री म्हणून तर उत्तम आहेच पण माणूस म्हणून देखील ती खूप चांगली आहे. जेव्हा मला कळलं की मला रेणुका ताई सोबत काम करायचंय तेव्हा मला या आधी दडपण होतं. पण तिच्या फ्रेंडली स्वभावामुळे काम करणं सोपं जातंय आणि आमची टीम खरंच सॉलिड बनतेय.”
या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोजमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल विचारले असता पुष्कराज म्हणाला, “मी जवळपास ५ वर्षांनंतर झी मराठीवर परतलो आहे त्यामुळे प्रेक्षकांकडून खूप चांगलं वेलकम झालं त्याबद्दल समाधान आहे. प्रेक्षकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय. तसंच पहिल्यांदा मी झी मराठीवरील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता तर आहेच पण त्याचसोबत एक प्रश्न देखील पडला आहे. तो हा की कार्यक्रम तर लग्नासंदर्भात आहे आणि पुष्कराजचं तर लग्नच झालेलं नाहीये. पण त्याबद्दल माझा काय स्टॅन्ड आहे हे प्रेक्षकांना लवकरच कार्यक्रमातून कळेल.”
कोणतंही शूट करताना ‘किस्से’ घडतंच असतात. त्याबाबत बोलताना पुष्कराज म्हणाला की, “अजून तरी सांगावा असा किस्सा घडलेला नाही. परंतु जसे आणखी एपिसोड्स शूट होतील तसे किस्से घडण्याची शक्यता अधिक आहे. सुरुवातीचे काही एपिसोड्स मी चाचपडत होतो. या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक हे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत त्यामुळे त्यांना अभिनय किंवा कॅमेऱ्यासमोर वावरायची सवय नसेल असं आम्ही गृहीत धरले होते. पण जेव्हा काही जण येऊन त्यांचे सुप्त कलागुण दाखवतात आणि ज्या आत्मविश्वासाने कॅमेरासमोर वावरतात ते पाहून कधी कधी आम्ही खूप थक्क होतो.”
प्रेक्षकांना आपलासा वाटणारा पुष्कराज चिरपुटकर ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत असून हा कार्यक्रम प्रसारित होतो शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वर.
हेही वाचा - रितेश जेनेलिया जोडीचा 'मिस्टर मम्मी' चित्रपटाच्या शुटिंगला इंग्लंडमध्ये आरंभ