मुंबई - नाटकाच्यावेळी मोबाईल फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकांमुळे सर्वच कलावंतांना त्रास होत असतो. याबद्दल अनेकवेळा कालाकारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अखेर सुबोध भावेने ठाम भूमिका घेत प्रेक्षक जर असेच वागणार असतील तर नाटकात काम करण्याचे थांबवणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नाट्य प्रेक्षकांमध्ये चर्चेला सुरूवात झाली. आता याला नाट्यगृह प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या प्रबोधनकार के. सि. ठाकरे नाट्यमंदिराने नाट्य कलावंतांच्या पाठीशी ठाम उभे राहत प्रेक्षकांना आवाहन केले आहे. थिएटरच्या बाहेर एक बोर्ड लावण्यात आला आहे. प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाण्यापूर्वी आपला मोबाईल फोन सायलेन्ट मोडवर टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुबोध भावे आणि इतर कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाट्य कलावंतांना यातून चांगले काहीतरी फलित मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रबोधनकार के. सि. ठाकरे नाट्यमंदिराने उचलेले हे पाऊल खूपच सकारात्मक आहे. अशाच प्रकारची भूमिका सर्वच थिएटरनी घ्यावी अशी मागणी जोर धरू शकते. आडमुठ्या प्रेक्षकांना ताळ्यावर आणण्यासाठी ही एक मोहिम राबवली जाणे आवश्यक बनलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रबोधनकार के. सि. ठाकरे नाट्यमंदिराने घेतलेल्या भूमिकेबद्दल सुबोध भावेने आपल्या इनस्टाग्रामवर आभार मानताना लिहिलंय, "धन्यवाद प्र. ठाकरे सभागृह. नाटक फक्त आमचं नाहीये तर ते आमच्या पेक्षा जास्त प्रेक्षक म्हणून तुमचं आहे.
आमचा मान ठेवा अगर ठेवू नका पण त्या नाटकाचा मान ठेवा हीच विनंती. कुठल्याही नाटकाला किंवा जिथे मोबाईल सायलेंट मोड वर ठेवण्याची विनंती केली जाते तिथे तो त्या अवस्थेत ठेवणं हाच समंजसपणा. आनंद मिळवण्याच्या मध्ये कुठलाही व्यत्यय नको."
‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्यावेळी सुबोध भावेला मोबाईलवर बोलणाऱ्या प्रेक्षकांचा कटू अनुभव आला होता. त्यानंतर सुबोधने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रयोगादरम्यान फोन वाजल्यास यापुढे नाटकात काम करणार नाही, अशी टोकाची भूमिकाही त्याने घेतली होती.” यानंतर प्रेक्षकांसह कलाकारांनी सुबोधला पाठींबा दर्शवत अशा बेजबाबदार प्रेक्षकांना धडा शिकवण्याचा निर्धार केलेला सोशल मीडियावर दिसत आहे.