मुंबई - मालिकांच्या जगात सध्या जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. मराठीतील मालिकांमध्ये सरंजामी थाट दिसायला लागल्यावर त्यावर कडी करण्यासाठी 'स्टार प्रवाहवर जिवलगा ही नवीन मालिका लवकरच सुरू होते आहे. अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांना एकत्र आणणारी अशी ही महामालिका एक आगळीवेगळी प्रेमकथा असेल. ज्यात स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील.
मराठी मालिकांच्या जगात सध्या भव्य दिव्य मालिकांचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. याच शृंखलेतील एक असणाऱ्या जिवलगा या मालिकेतही उंची, गाड्या आणि भरजरी स्टायलिश कपडे घातलेले कलाकार आपल्याला दिसतील. स्त्री-पुरुष नातेसंबंधातले वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे.
नातेसंबंध टिकवताना आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल अंदाज चुकतात त्यामुळे नात्यात कसा गुंता निर्माण होतो, या भोवतीच मालिकेचं कथानक गुंफण्यात आलं आहे. या मालिकेद्वारे स्वप्निल जोशी तब्बल सात वर्षांनी मराठी मालिकेत पुनरागमन करतोय तर सिद्धार्थ चांदेकर ही ९ वर्षांनी पुन्हा मालिकेत दिसेल. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आजवर सात रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला असला तरीही अभिनेत्री म्हणून तिची ही पहिलीच मालिका असेल.