कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली पाच वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या' मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे ‘होउ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला. आणि या यशस्वी पर्वा नंतर 'चला हवा येऊ द्या'च विशेष सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं. आता 'लेडीज जिंदाबाद' म्हणत चला हवा येऊ द्या चं नवीन पर्व सुरु होत आहे.
थूकरटवाडीमध्ये सत्ता गाजवणाऱ्या विनोदवीरांना, महाराष्ट्र आणि जगभरातील प्रेक्षकांना ह्या महिला विनोदाचा दे धक्का देणार हे नक्की, महिला एकत्र आल्या की, चर्चा तर होणारच, आणि सोबत गॉसिप पण रंगणार. या नवीन पर्वात स्पर्धक कोण याची उत्सुकता असेल ना. झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांमधील अभिनेत्री यात स्पर्धक म्हणून असणार आहेत.
हेही वाचा - सुशांतच्या मृत्यूनंतर कंपनीच्या आयपी अॅड्रेसमध्ये दोनदा बदल
तुला पाहते रे मधील ईशा (गायत्री दातार), स्वराज्य रक्षक संभाजी मधील सोयरा मातोश्री (स्नेहलता वसईकर), लागीर झालं जी मधील शीतली (शिवानी बावकर), अग्गबाई सासूबाई मधील प्रज्ञा आणि मॅडी (संजीवनी साठे आणि भक्ती रत्नपारखी) सोबत सुरुची अडारकर, मयुरी वाघ, पूर्वा शिंदे, सरिता मेहेंदळे असणार आहेत. तेव्हा चला हवा येऊ द्याचं हे लेडीज स्पेशल पर्व लवकरच सुरू होणार आहे. आता टीव्हीवर अनेकदा रडताना किंवा दुसरीला रडवताना दिसणाऱ्या या अभिनेत्री या कार्यक्रमात प्रेक्षकांना कशा हसवतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे.