नुकताच सुरु झालेला 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडतोय. या कार्यक्रमाची एक परंपरा आहे ती म्हणजे दर आठवड्याला एका कर्मवीराला निमंत्रित केले जाते आणि त्यांना हॉट सीटवर बसवून खेळ खेळला जातो आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलची प्रेक्षकांना सखोल माहिती दिली जाते. यावेळी पहिला कर्मवीर होण्याचा मान मिळणार आहे जेष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर यांना.
नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. आपल्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. तर यावेळेस कर्मवीर म्हणून खेळणार आहेत नाना पाटेकर.
आता नाना पाटेकर नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत आणि पुढील कर्मवीर भागांतून विविध मान्यवर दिसतील.
'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या भागात पद्मश्री अभिनेते 'नाना पाटेकर' कर्मवीर म्हणून येणार आहेत. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रसारित होतो सोम - शनी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
हेही वाचा - HBD Katrina : कॅटरिना कैफला आहेत सहा बहिणी आणि एक भाऊ