मराठी चित्रपट ‘लग्न पाहावे करून’ या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता तब्बल ८ वर्षानंतर ते पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहेत. यावेळेस ते छोट्या पडद्यावर एकत्र आले असून सोनी मराठीची नवीकोरी मालिका 'अजूनही बरसात आहे' मधून ते आपल्या अभिनयाचे अनोखे रंग प्रेक्षकांसमोर उधळणार आहेत. ‘रोमँटिक’ ऋतू, पावसाळा, सुरु होत आहे आणि ‘अजूनही बरसात आहे' मधून मुक्ता आणि उमेश यांची चाकोरीबाहेरची प्रेमकथा उलगडण्यात येणार आहे.
कोरोना काळातही सोनी मराठीने प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू दिलेला नाहीये. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्याने घेऊन येत असते आणि त्यात आता 'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेची भर पडली आहे. मराठी मनोरंजनक्षेत्रातील दोन आघाडीचे कलाकार, प्रेक्षकांचे लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेकविध रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. तसेच उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच बनला आहे. त्यानेही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून, ये रे ये रे पैसा अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांतूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी मुक्ता आणि उमेश ही अभिनयात मुरलेली जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे,’’अजूनही बरसात आहे' या मालिकेतून जी येत्या १२ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
हेही वाचा - विक्की आणि कॅटरिना 'प्रेमीयुगुल', हर्षवर्धन कपूरने दिला दुजोरा