नागपूर - धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये 'फॅशन शो' चे आयोजन यशस्वी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये 'शेगांवीचा महायोगी' या नाटकाचा मुहूर्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाटकातील कालाकारांसह शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
कोरोनाच्या नकारात्मक वातावरणातून नागपूरकर जनतेला बाहेर काढण्यासाठी आणि सांस्कृतिक विश्वामध्ये परत एकदा नवसंचाराचे वारे निर्माण करण्यासाठी राधिका क्रिएशन्सकडून गजानन महाराज यांच्यावर आधारित 'शेगांवीचा महायोगी ' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या 'पहिल्या घंटेने परत एकदा नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात जीवन फुंकण्याचा मुहूर्त साधला जाणार आहे. कोरोना महामारीच्या धास्तीमुळे मागील नऊ महिन्यांपासून नाट्यगृहे बंद आहेत. नागपूर शहरात नाटकच काय पण इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम या कालावधीत झालेले नाहीत. त्यामुळे नाट्य निर्माते, कलावंत यांचे खूप नुकसान झाले. सर्वत्र नकारात्मकतेचे वातावरण पसरलेले असताना नागपूरच्या नाट्यसृष्टीला त्यातून बाहेर काढण्यासाठी ' शेगांवीचा महायोगी ' या नाटकाचे सलग तीन प्रयोग करण्यात येणार आहेत.
धावत्या मेट्रोत कार्यक्रमांच्या आयोजनाचे क्रेज वाढत आहे.
मेट्रोमध्ये वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासह अनेक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चांगली प्रसिद्धी मिळाल्यामुळे लहान सहान कार्यक्रमांसाठी अगदी कमी खर्चात पर्याय उपलब्ध झाला आहे. या योजनेचा फायदा घेत आज नाटकाचा मुहूर्त देखील धावत्या ट्रेनमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा - दीपिकाने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन सर्व पोस्ट केल्या डिलीट, चाहत्यांमध्ये खळबळ