मुंबई - अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची जोडी असेलला 'मिस यु मिस्टर' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच मुंबईत या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. या सिनेमाद्वारे दिग्दर्शक समीर जोशी यांनी डिस्टन्स रिलेशनशिप जपणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट मांडली आहे.
एकमेकांच्या करिअरला स्पेस देतानाच नात्यातली बूज राखणारी अनेक जोडपी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही जोडपी तर परदेशातही वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने एकमेकांना वीकेंड पुरतीच भेटतात. पण या जोडप्यांचे आयुष्य खरच तेवढं सोपं असत का? त्यांच्या नात्यातला समंजसपणा खरा असतो का समाजाला दाखवण्यापूरता असतो? त्यांच्यात वाद झाले तर नक्की ते सुटतात की चिघळतात? आशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'मिस यु मिस्टर' या सिनेमाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमात काम करण्याचा एकंदर अनुभव कसा होता ते अभिनेत्री मृण्मयी आणि सिद्धार्थ यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी....
महाविद्यालयात असताना 'पोपटी चौकट' ही एकांकिका, त्यानंतर 'हम ने जिना सिख लिया' हा सिनेमा आणि त्यानंतर 'अग्निहोत्र' ही मालिका एकत्र करणारी मृण्मयी- सिद्धार्थ यांची जोडी या सिनेमासाठी पुन्हा एकत्र अली आहे. मृण्मयीने या सिनेमात पुण्यात राहणाऱ्या 'कावेरी' या मुलीची भूमिका केली आहे. तर सिद्धार्थ हा लंडनमध्ये कामासाठी गेलेल्या 'वरुण' या तरुणांची भूमिका करतोय.
'डिस्टन्स रिलेशनशिप'मध्ये एकमेकांनी वेळ दिला तर बरेच प्रश्न सोपे होतात असं मृण्मयीने म्हटले आहे. तर, सिध्दार्थने डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये मुलाने पटकन सॉरी म्हणायला शिकलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात, असं मत व्यक्त केलं. या दोघांशिवाय राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर आणि राधिका क्षीरसागर यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.